भारतातील सर्वधर्म समभावाचे आकलन: एक प्रयत्न

मे. पु. रेगे यांच्या इहवाद आणि सर्वधर्म समभाव या पुस्तकाचे रसग्रहण

 

मुळात तत्व चर्चा किंवा नीती चर्चा म्हटले की ती रटाळ असणार आणि आजच्या काळात ती कशी बिनमहत्वाची आहे आणि आपलं रोजचं आयुष्य जगताना ती कशी निरुपयोगी आहे असाच समज सगळ्यांचा असतो आणि काही प्रमाणात तो योग्य देखील आहे. पण मुळात तत्वचर्चा आणि नितीविचार का आणि किती महत्वाचा आहे असा मुलभूत विचार आपण कधी करतो का? आणि असा विचार करण्याची गरज आहे का या प्रश्नांना आधी आपल्याला भिडावे लागेल।

आपल्या देशाचा, इतिहासाचा आणि संस्कृतीचा विचार केल्यास या अशा चर्चा आणि मीमांसा आपल्याला नवीन नाहीत। किंबहुना भारतीय दर्शन साहित्यात अशा चर्चांची रेलचेल दिसून येते। पण मुद्दा एवढाच कि हे चिंतन आजच्या काळाला उपयोगी पडेल असे आहे का आणि तसे ते नसेल तर असे चिंतन घडवून आणण्याच्या शक्यता आहेत का हे देखील तपासून बघावे लागेल। हे घडवण्याची अशी जबाबदारी आहे आपल्या पैकी प्रत्येकाची… कारण जो समाज आपली मुलभूत तत्वे आणि संस्कृतीची प्राणबीजे हरवून बसतो त्या समाजाला कुठलही भविष्य असत नाही। म्हणून हे अशा प्रकारचे मंथन सतत होणे गरजेचे आहे.

तत्वज्ञानाच्या प्रांतात अनेक मुलभूत प्रश्नांची चर्चा बघायला मिळते आणि ती दिशादर्शक ठरत असते। ज्या तत्वांची चर्चा तत्वज्ञानात होते त्यापैकी एक म्हणजे नीती आणि धर्म, समाज आणि धर्म यांतील नाते। मी सध्या वाचत असलेल्या इहवाद आणि सर्वधर्मसमभाव या पुस्तकाची जातकुळी काहीशी अशीच आहे। इहवाद म्हणजे काय आणि त्याचा सर्वधर्मसमभावाशी असणारा संबंध याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा मुख्य विषय। मुळात म्हणजे इहवाद म्हणजे secularism हे भाषिक रूपांतर तितकेसे बरोबर नाही आणि secularism ला सर्वधर्मसमभाव असे म्हणणे हे देखील तेवढे बरोबर नाही असा युक्तिवाद या पुस्तकात स्पष्ट केलेला आहे। या अनुषंगाने धर्मसत्ता, राजसत्ता आणि नितीविचार याची भारतीय आणि पाश्चात्त्य विचाराच्या दृष्टीने मीमांसा केली आहे। या ओघात धर्मसत्ता आणि राजसत्ता यातील क्रिया प्रतिक्रिया समाज आणि नीती यावर कसा प्रभाव पाडतात याचे सूक्ष्म विवेचन यात आहे। युरोपातील विचार हा खऱ्या अर्थाने इहवादी कसा बनला, ग्रीक तत्वज्ञानाने या इहवादी विचारात कशी मोलाची भर घातली याचाही परामर्श यात घेतला आहे।
या तात्त्विक चर्चेपेक्षा या पुस्तकाचे महत्वाचे योगदान आहे ते भारतीय हिंदू, सनातनी आणि इस्लाम परंपरांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात। भारतीय दर्शनांचा ईश्वर विचार आणि नीती इस्लामला सामावून घेण्यात कमी पडला आणि म्हणून सर्वधर्मसमभाव हा खऱ्या अर्थाने भारतीय मातीत कधी रुजलाच नाही हा एक महत्वाचा विचार हे पुस्तक देते। एके काळी ग्रीक आणि युरोपीय विचारांच्या बरोबरीने इस्लाम विचार हा प्रगत समजला जायचा आणि तो सर्वसमावेशी देखील होता परंतु धर्मसत्तेच्या प्रभावामुळे तो संकुचित बनत गेला। काळाच्या ओघात इस्लाम विचार अधिकाधिक मूलतत्त्ववादी होत गेला आणि कट्टर बनला। यातून नुकसान झाले ते इस्लामी जनतेचे। हिंदू बहुसंख्य असणाऱ्या भारतासारख्या देशात मुस्लिम अल्पसंख्याक म्हणून कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आणि त्यांचा अनुनय करून मतांचे राजकारण या देशात होत राहिले। पण त्यापलीकडे जाऊन मुस्लिम समाजाच्या हिताचा विचार कोणी केल्याचे दिसत नाही आणि विरोधाला विरोध म्हणून हिंदू बहुसंख्याकांनी मुस्लिम विचार नाकारला। पण महत्वाचे म्हणजे ‘बहुसंख्यांकांचा जातीयवाद हाच खरा जातीयवाद असतो। तो मावळला तर त्याला प्रतिक्रिया म्हणून उदयाला आलेला अल्पसंख्यांकांचा जातीयवाद विरघळून जातो’ हा या पुस्तकाने दिलेला अत्यंत मौलिक विचार। या पुस्तकातील सामाजिक मानसिकतेचे वर्णन हे आजही तंतोतंत लागू पडणारे आहे। 1996 साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची उपयोगिता आज 2020 सालात देखील तसूभर कमी झालेली नाही यातच या लेखकाचे द्रष्टेपण दिसून येते। थोडक्यात, समाज म्हणून हिंदू आणि मुस्लिम समाजाला कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। असे चिंतन आपण जेव्हा प्रामाणिकपणे करू त्यादिवशी आपण खऱ्या अर्थाने इहवादी होऊ।

– अपर्णा कुलकर्णी

Related posts